एकसुरात मिळाली, मराठी शाळांना नवीन ऊर्जा;
मराठी शाळा कृती समितीची स्थापना व उत्कर्षांचा एल्गार
मीरा-भाईंदर, १९ नोव्हेंबर : 'मराठी एकीकरण समिती'च्या संकल्पनेतून शहरातील बारा संस्था आणि २२ खाजगी मराठी शाळांसाठी 'मराठी शाळा कृती समिती'ची स्थापना करण्यात आली आहे. मराठी शाळांच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी धोरणात्मक कार्यक्रम आखण्यासाठी, गेल्या रविवारी संध्याकाळी, एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून अभिनेत्री चिन्मयी सुमीत (मराठी शाळा - सदिच्छादूत), सौ. मुग्धा लेले (मुख्याध्यापिका - उत्कर्ष विद्यामंदिर, विरार) आणि श्री. सुधीर देसाई (मुख्याध्यापक - विद्यामंदिर, दहिसर) हे उपस्थित होते.
मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री. प्रदीप सामंत यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले, "आज मुंबईत मराठी शाळांची जी दुरावस्था झाली आहे, तशी मीरा-भाईंदर शहरात होऊ नये. शहरातील मराठी शाळांचा विकास व्हावा, उत्कर्ष व्हावा, मराठी शाळांचे संवर्धन होऊन, नवीन रूपात ह्या शाळा जोमाने उभ्या राहाव्यात. या जनजागृतीसाठी आणि मराठी शाळांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी, या कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे."
कार्यक्रमादरम्यान लगेचच एक सकारात्मक परिणाम दिसून आला. मराठी एकीकरण समितीतर्फे एका शाळेला संगीत शिक्षक आणि दुसऱ्या शाळेला गरजेनुसार संगणक शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला. 'आपण सर्व एकत्रित राहून मराठी शाळांचा उत्कर्ष करूया' असा निश्चय करण्यात आला. मातृभाषेतून शिक्षण व पुस्तकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त उपक्रम, कला- क्रीडा व कृती कार्यक्रम कसे राबवता येतील, कौशल्य विकास कसा करता येईल, याबाबत चर्चा झाली. एकमेकांच्या सहयोगातून, समन्वयातून व सहकार्यातून सर्व शाळांचा विकास व उत्कर्ष करता येईल, याबाबत वारंवार बैठका घेऊन शाळांची पत व पटसंख्या सुधारता येईल, असे ठरले.
सौ. मुग्धा लेले या आपला ३७ वर्षांचा शिक्षणक्षेत्रातील अनुभव मांडताना म्हणाल्या कि, शिक्षकांनी चोवीस तास आपल्या डोक्यात 'आपली शाळा आणि विद्यार्थी' याचा ध्यास ठेवला पाहिजे. श्री. सुधीर देसाई म्हणाले, "आपण नवीन तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. विश्वस्त, शिक्षक, पालक यांचा त्रिवेणी संगम साध्य झाला, तर मराठी शिक्षण संस्थांना 'वर्ग कमी पडतील'. मराठी शाळेचे दिवस नक्कीच पालटतील."
मराठी शाळा सदिच्छादूत म्हणून कार्यरत असताना विविध शाळांबाबत आपले अनुभव चिन्मयी सुमीत यांनी मांडले. त्या म्हणाल्या, "आपले लोकप्रतिनिधी मराठी माध्यमांविषयी निष्क्रिय आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जनआंदोलन करणे हाच यावर उपाय आहे. शिक्षणाची पुस्तकी भाषा व व्यवहारातील भाषा यांच्यात मेळ घालावा लागेल. मराठी शाळांच्या उत्कर्षासाठी मी सदैव समिती सोबत कार्यरत राहीन." असे त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.
उपस्थित शाळांचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रत्येकी आपले मनोगत मांडले. अनेक पालकांनी सूचना मांडताना त्यांचे पाल्य - विद्यार्थी मराठी शाळेत शिकत असल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला. बाळकृष्ण मस्के या आदर्श विद्या निकेतन शाळेच्या माजी विद्यार्थ्याने म्हटले, "मी मराठी शाळेत शिकल्यानेच, आत्मविश्वासाने एक मल्टी नॅशनल कंपनी स्थापन करू शकलो आहे. आज अनेक देशात माझा व्यवसाय विस्तारू शकलो." असे सांगताना संचालक श्री केसरीनाथ म्हात्रेसह, शिक्षक व सर्वच श्रोते भावुक झाले.
शहरातील साहित्यिक, लेखक, कलाकार, संस्था प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी, शिलेदार, मराठी प्रेमी नागरिक उपस्थित होते. अध्यक्षपदी श्री. रविंद्र भोसले उपस्थित होते. सौ. पूजा सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ. स्वाती जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. रविंद्र आल्हाट यांच्या सुस्वर आवाजात राज्यगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आमच्या चॅनेल ला लाईक, शेयर आणि सब्सक्राइब करा!
Информация по комментариям в разработке