नारायण गंगाराम सुर्वे, महाराष्ट्रातील एक आगळे आणि लोकप्रिय मराठी कवी.
त्यांना “जनकवी” असेही म्हटले जायचे.
त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ व मृत्यू १६ ऑगस्ट २०१० रोजी झाला.
१९२६-२७ मध्ये रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला आणि काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले.
कमालीचे दारिद्ऱ्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष, यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले.
घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून गंगाराम सुर्वे यांनी नारायणला मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले.
पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले.
सुरवातीला भाकरीचा चतकोर मिळविण्यासाठी नारायण सुर्वे यांनी घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या अशी कामे केली.
नंतर त्यांना मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली आणि १९६१ मध्ये ते शिपायाचे शिक्षक झाले आणि तेव्हापासून ते गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले.
तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना १९९८ चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
नारायण सुर्वे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४), मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार, सोव्हिएत रशियाचं नेहरू ॲवॉर्ड तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार देण्यात आले.
आज त्यांच्या काही निवडक कविता येथे सादर करत आहे.
----------------------------------------------
कवितेच नाव आहे - दोन दिवस वाट पाहण्यात गेले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता,
किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच,
जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व,
दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले,
कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत;
पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन,
साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद,
तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दुःखात गेले।
----------------------------------------------
कवितेच नाव आहे - तेव्हा एक कर....!
जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर...
तेव्हा एक कर....तू निःशंकपणे डोळे पुस...
ठीकच आहे चार दिवस
उर धपापेल, जीव गुदमरेल.
उतू जाणारे हुंदके आवर,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लागू नकोस
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर
मला स्मरून कर,
हवे तर मला विस्मरून कर.
----------------------------------------------
कवितेच नाव आहे - आज माझ्या वेदनेला
आज माझ्या वेदनेला, अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर, थाप बिजली देत आहे
आज मरण आपुल्याच, मरणाला भीत आहे.
आणि मृत्युंजयी आत्मा, पुन्हा धडक देत आहे ।
आज शुष्क फांद्यावर, बहर नवा येत आहे.
भूमीच्या गर्भामधुनी, बीज हुंकार देत आहे.
आज सारे गगन थिटे, नजरेला येत आहे.
काळोखाच्या तबकडीत, सूर्य गजर देत आहे
आज तडकलेले मन, एकसंध होत आहे.
आणि उसवलेले धागे, गुंफूनीया देत आहे
आज माझ्या कोरड्या, शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे, क्षितीज रुंद होत आहे.
----------------------------------------------
कवितेच नाव आहे - कामगार आहे मी
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे.....
रोजीचा रोटीचा सवाल, रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,
थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखीलेले आहे
माझ्या जगाची एक, गन्धवेनाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगात आहे मी, तसाच शब्दातही आहे,
रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग, राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती, फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती, खडगे मी देत आहे,
एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे
सावध अशा तुफानाची, हीच सुरवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे,
----------------------------------------------
कवितेच नाव आहे - विझता विझता स्वत:ला
झूठ बोलून आयुष्य, कुणालाही सजवता येते.
अशी आमंत्रणे आम्हालाही आली;
नाहीच असेही नाही.
असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही,
असेही नाही
शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप;
नाहीत असेही नाही.
असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग,
नाहीत असेही नाही
अशा बेइमान उजेडात, एक बात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही,
असेही नाही
----------------------------------------------
नारायण सुर्वे
Информация по комментариям в разработке