LKSS.22 Vidushi Manjiri Asanare - Raga Abhogi Kanada

Описание к видео LKSS.22 Vidushi Manjiri Asanare - Raga Abhogi Kanada

LKSS.22 - लोणावळा खंडाळा (निवासी) संगीत संमेलन – शुक्रवार, २५ मार्च २०२२
Vidushi Manjiri Asanare: Pt Ramdas Palsule, Shri Anant Joshi and Smt Devashree Nawghare

रसिकांनी एकत्र येऊन संगीत ऐकण्याला गेल्या २ वर्षात संगीत रसिक पारखे झाले होते. या पार्श्वभूमीवर ३ दिवस लोणावळ्यामध्ये निवास करून कलाकार आणि संगीत रसिक एकत्र येतात आणि संगीताचा आनंद मनमुराद घेतात ही मानसिक समाधान देणारी बाब होती हे खरेच, शिवाय कोणत्याही इतर व्यवधानांचा विचार न करता फक्त संगीतावरच लक्ष केंद्रित करून त्या कलेचा आनंद लुटणे हे केवळ निवासी संगीतामुळे शक्य झाले.
२५-२६-२७ मार्च २०२२ रोजी मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथे संपन्न झालेल्या संमेलनाचा पहिला दिवस मंजिरी असनारे यांच्या गायनाने संस्मरणीय ठरला. त्यांनी गायलेला अभोगी कानडा हा जोडराग दोन रागांचे विणकाम कसे लीलया करावे याचा वस्तुपाठच होता. दरबारी कानडा रागामध्ये गंधार, धैवत आणि निषाद हे कोमल स्वर असतात. गंधार आणि धैवत या स्वरांचे आंदोलन वेगळा परिणाम साधते. आरोह आणि अवरोहामधला गंधार वेगळ्या स्वरांच्या संगतीने लावल्यामुळे ते या रागाचे वैशिष्ट्य ठरते. अभोगी या रागामध्येही कोमल गंधार लावला जातो पण कर्नाटक संगीतामधून आलेल्या या रागामध्ये पंचम आणि निषाद वर्ज्य आहेत. अभोगी रागामध्ये दरबारी कानडा रागामधील काही स्वरसंगती गुंफून अभोगी कानडा राग सादर केला जातो, ज्याचे अप्रतिम विवेचन मंजिरी यांनी त्यांच्या अमोदिनी या वेब-सिरीजमध्ये केले आहे. दोन्ही रागामधील गंधार वेगळा कसा आहे आणि जोड रागामध्ये तो कसा गायला जातो हे मंजिरी असणारे-केळकर यांच्याकडून ऐकणे ही सांगीतिक पर्वणीच ठरते. अभोगी कानडा राग सादर करताना मंजिरी यांनी आलापीमधून दोन्ही रागांचे स्वरुप आणि त्यांचा मिलाफ कसा होतो, याची अनुभूती श्रोत्यांना दिली. अभोगी कानडा रागामध्ये ‘ए बरजोरी करे सैय्या’ ही रूपक तालामधली बंदिश शिस्तबद्धरित्या सादर करताना विलंबित लयीमधल्या संगीताचे सौंदर्य मंजिरी यांनी रसिकांना दाखवले. मंजिरी यांच्या गायनामध्ये जयपूर गायकीचा ठेहेराव आहे. राग विस्तार करताना स्वरांची मांडणी आणि गुंफण कशी करावी याचे आदर्श त्यांच्या मैफिलीमध्ये दिसतात. आलापी, बेहेलावा, बोल-आलाप या क्रमाने रागाची बढत करताना शिस्तबद्ध पद्धतीने रागविस्तार करतात शिवाय त्यामध्ये त्यांची कल्पकता दिसते. राग मांडणी करताना तानांचा मोजकाच वापर हे त्यांच्या गायनाचे आणखी वैशिष्ट्य. कोणते सांगीतिक अलंकार केव्हा आणि किती प्रमाणात वापरावे हे सौंदर्यभान मंजिरी यांच्या सुरेल गायनामध्ये दिसून येते त्यामुळे त्यांच्या गायनाचा दर्जा उंचावलेला राहतो. ‘बिनती मोरी सून गोपाल’ ही एकतालामधली रचना सादर केल्यानंतर मंजिरी यांनी बसंत बहार रागामध्ये ‘फुली नयी लगे’ ही आद्धा तीनतालात सादर करण्यापूर्वी मंजिरी यांनी दोन्ही रागाच्या जोडरागाचे मर्म आलापीमध्ये सुरेलरीत्या सांगितले. रामदास पळसुले यांनी मंजिरी यांच्या गायनाला पूरक संयमित तबला साथ केली. अनंत जोशी यांनी हार्मोनियम साथ करताना जोड रागामधील मर्म अलगदपणे उलगडून दाखवले.

Комментарии

Информация по комментариям в разработке