डिस्कव्हर महाराष्ट्र भाग दोन | आदर्शगाव हिवरे बाजार | MODEL VILLAGE HIVARE BAZAR | पोपटराव पवार

Описание к видео डिस्कव्हर महाराष्ट्र भाग दोन | आदर्शगाव हिवरे बाजार | MODEL VILLAGE HIVARE BAZAR | पोपटराव पवार

डिस्कव्हर महाराष्ट्र भाग दोन | आदर्शगाव हिवरे बाजार | MODEL VILLAGE HIVARE BAZAR | पोपटराव पवार

अहमदनगरपासून 16 कि. मी. अंतरावरचं हिवरे बाजार. अंदाजे 1200 लोकवस्तीचं हे एक केवळ खेडं नाही. ते आहे वैभवशाली इतिहासाची जपणूक करणारं, आधुनिकतेची कास पकडून समृद्धीचा मंत्र सांगणारं एक छोटंस हिरवंगार गाव.

खेडं हा भारताचा आत्मा आहे. खेड्यांच्या शाश्वत विकासातून समृद्ध भारताची पायाभरणी कशी होते याचे उत्तम उदाहरण हिवरे बाजारने निर्माण केले असून एक आदर्श गाव म्हणून राज्याला आणि देशाला आपली स्वतंत्र ओळख करून दिली आहे. या आदर्शत्वाचा जवळून अनुभव घेण्यासाठी या गावाला भेट दिली आणि अनेक गोष्टी मनाला स्पर्श करून गेल्या.

हिवरे बाजारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. गावात पूर्वी हत्ती, घोड्यांचा बाजार भरवला जायचा. या बाजारामुळेच गावाच्या नावामागे बाजार हा शब्द चिकटला तो कायमचाच. पूर्वीपासून समृद्ध असलेल्या या गावात वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव पडला. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधींचा अभाव, अस्वच्छता, स्थलांतर यासारख्या समस्यांनी इतर गावांप्रमाणे या गावालाही ग्रासलं. पण गावानं हा अनुभव घेतला तो 1989 पर्यंत. बाहेर शिकायला गेलेली मंडळी शिकली, मोठी झाली आणि शहरातच स्थिरावली. पण एक ध्येयवेडा तरूण शिकल्यानंतर गावातच काम करायचं या निर्धाराने गावी परत आला. त्याचं नाव पोपटराव पवार.

बदल करायचा तर सत्ता हातात हवी, म्हणून गावाच्या राजकारणात उतरून ते गावचे सरपंच झाले. गावात माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा लोकसहभागातून गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न. पोपटराव पवारांचा गाव विकासाचा निर्धार अधिकाधिक पक्का होत गेला.

पूर्वी फक्त कागदोपत्री ग्रामसभा व्हायची. मग आपल्या कामात लोकसहभाग मिळवायचा कसा? त्यांनी युक्ती लढवली. ग्रामसभेची तयारी बरेच दिवस आधी करून प्रत्येक घरात ग्रामसभेचा निरोप आणि ग्रामसभेत चर्चेला घ्यावयाच्या विषयांची यादी पाठवली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. ग्रामसभेच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त लोक सभेला आले, चर्चा झाली, लोकांनी आपली मतं मांडली, निर्णय झाले. त्या दिवशी खऱ्या अर्थाने गाव विकासाचे नियोजन लोकांमधून झाले आणि गावकऱ्यांच्या मनात गाव विकासाप्रती एक बांधिलकीही निर्माण झाली.

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा विचार ग्रामसभेत मांडण्यात आला. केवळ शासनावर विसंबून न राहता पूर्ण गावानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आसपासचा डोंगर, पडीक तसेच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झाली. दरवर्षी मानसी एक झाड लावण्याचा संकल्प करताना गावाने स्मृतिवन विकसित केले. गावातील मृत व्यक्तीच्या नावाने येथे झाड लावलं जातं, त्याचं संगोपन केलं जातं.

पावसाचं पाणी अडवण्यासाठी सरल समतल चर, पाझर तलाव खोदण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या शक्यतेनुसार शेतात शेततळी घेतली. काही वर्षात श्रमदानातून लावलेली ही झाडं आता जंगल वाटावीत एवढी मोठी आणि हिरवीगार झाली आहेत. पाणी अडवा- पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्याने पडलेल्या पावसाचं पाणी अडलं-जिरलं. त्याचा परिणाम गावातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी वाढण्यात झाला.

गणपती किंवा नवरात्री सारखे उत्सव साजरे करताना प्रतिकात्मक छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे दरवर्षी नवी मूर्ती विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत तर होतेच त्याचबरोबर जलप्रदूषणालाही आळा बसतो. गावात उत्सवकाळात घरगुती पुजांमधून निर्माण होणारे निर्माल्य एकत्र करून त्याचा खत म्हणून वापर केला जातो.

गावात तंटा नाही की दारू. गावात दारु तसेच गुटखाबंदीची 100 टक्के अंमलबजावणी केली जाते. गावातील दुकानात गुटखा, तंबाखु, सिगारेट विक्रीला बंदी आहे. ग्रामसभेने तसा केवळ ठराव केला नाही तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली.

ग्रामविकासाच्या सर्व कामात आणि समित्यांमध्ये महिलांचा सहभाग चांगला असून गाव, गावठाण, रस्ते, वस्त्यांची स्वच्छता यामध्ये सगळा गाव एक होऊन काम करतो. गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. त्यापासून गांडूळ तसेच कंपोस्ट खत तयार करण्यात येते. गावात वैयक्तिक 50, सार्वजनिक 4 ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती होते. गाव पूर्ण हागणदारीमुक्त असून शौचालय गोबरगॅसला जोडून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आला आहे.

गावात 8 सौरपथ दिवे आहेत तर ग्रामपंचायत कार्यालयात होम लाईट सिस्टिम बसविण्यात आली आहे. 78 घरांत सौर कंदिलाचा वापर सुरु आहे. गावातील 230 कुटुंबांपैकी 98 कुटुंबांकडे सौरदिवे आहेत. गावातील 73 कुटुंबांकडे गोबरगॅस, 90 कुटुंबांकडे बी.पी. ऊर्जा चूल, 58 कुटुंबांकडे एलपीजी गॅस आणि 8 जणांकडे रॉकेल स्टोव्ह आहे.

आज गावात श्रीमती सुनीताबाई पवार सरपंच आहेत तर पोपटराव पवार उपसरपंच. या द्वयींच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक बी.टी. लोंढे ग्रामविकासाची ही उज्ज्वल परंपरा पुढे नेत आहेत. एक मुल एक झाड, बालवृक्षमित्र पुरस्कार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी सारख्या उपक्रमाबरोबरच गावात लग्नात वराती आणि बॅन्जोला मनाई आहे.

विविध गावांचे सरपंच ते राष्ट्रीयस्तरावर नेतृत्व करणारी नेतेमंडळी देखील आहेत. त्यामुळेच हिवरे बाजार हे केवळ एक गाव नाही, ते आहे परिपूर्ण विकासाचं आदर्श संकल्पचित्र. जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगतेय हिरव्यागार गावांच्या समृद्धीचा मंत्र.

महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार - 1995
महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार - 2000
भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार - 2007
भारत सरकारचा वनग्राम पुरस्कार- 2007
भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार- 2007
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार- 2007
महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार 2008
राजमाता जिजाऊ पुरस्कार 2012

लेखिका - डॉ. सुरेखा म. मुळे

Комментарии

Информация по комментариям в разработке